हबक्कूक 2:2-20
हबक्कूक 2:2-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे! कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही, जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही! पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत:च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल. कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो. सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील? तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय? तू त्यांच्यासाठी बली असा होशील. कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेत, म्हणून त्या लोकांतले उरलेले तुला लुटतील, ते अशासाठी की, मनुष्याच्या रक्तामुळे, देश व गावे यांच्यावर केलेले जुलूम ह्यांमुळे त्या देशांतील व गावांतील लोक तुला लुटतील. ‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’ तू अनेक लोकांस मारलेस, त्यामुळे तू स्वत:च्या घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वत:च्या जिवा विरुद्ध पाप केले आहेस. भिंतीतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील. ‘जो रक्ताने शहर बांधतो, आणि जो अन्यायाने गाव वसवितो त्यास हाय हाय!’ त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल, आणि राष्ट्रे केवळ व्यर्थतेसाठी थकतील, हे सैन्याच्या परमेश्वरा कडून घडून आले नाही काय? तरीही जसे पाणी समुद्राला झाकते, तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल. ‘जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मद्य प्यायला लावते त्यास हाय हाय! तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो,’ ह्यासाठी की त्याचे नग्नपण पाहावे. तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेणे भरला आहेस! तू पण त्याची चव घे आणि आपली नग्नता प्रकट कर! परमेश्वराच्या उजव्या हातांतला प्याला तुझ्याकडे फिरत येईल, आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल. लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील. कारण मनुष्याचा रक्तपात व तेथील भूमीवर, शहरांवर, आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यांमुळे असे होईल. मूर्तीकाराने कोरून केलेल्या मुर्तिंमध्ये त्यास काय लाभ? कारण जो कोणी त्यास कोरतो, किंवा ओतीव मूर्ती तयार करतो, तो खोटा शिक्षक आहे, कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवतो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो, जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवतो. जो लाकडांच्या मूर्तीस म्हणतो जागा हो! किंवा दगडांच्या मूर्तीस म्हणतो ऊठ! त्यास हाय हाय! या वस्तू शिकवतील काय? पाहा! ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत, पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही. परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!”
हबक्कूक 2:2-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल. कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही. “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल. खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे. “ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’ तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? मग तुम्ही त्यांचे सावज बनाल. कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला. “धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो, विनाशापासून पळ काढावा म्हणून जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो! तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून, व घराचे दार इतरांकरिता बंद करून, स्वतःचा जीव गमाविला. खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील, आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील. “धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो आणि अन्यायाने नगर वसवितो! लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय? कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल. “धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल! तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल. लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे. “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही. धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’ किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’ ते मार्गदर्शन करू शकतात काय? त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत; पण त्यांच्यात श्वास नाही.” परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.
हबक्कूक 2:2-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही. पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने1 वाचेल. शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.” हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?” तुला चावणारे2 एकाएकी उठावणी करणार नाहीत काय? तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय? तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल. विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो. तू बहुत राष्ट्रांना नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहेस, आपल्या जिवाचा गुन्हेगार झाला आहेस. कारण भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल. जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो त्याला धिक्कार असो! पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय? कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल. जो आपल्या शेजार्याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो! तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस. सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल. लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल. कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली ह्यात काय लाभ? खोटा कौल देणार्या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा, श्रद्धा ठेवतो ह्यात काय लाभ? जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.