हबक्कूक 1:5-11
हबक्कूक 1:5-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही. कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात. ते दारुण व भयंकर आहेत; त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वत:चेच आहे. त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्या गरुडासारखे ते धावतात. ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात. ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात. शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.
हबक्कूक 1:5-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांचे परिक्षण करा, आणि आश्चर्याने विस्मित व्हा! कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की, त्या तुम्हास सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही. कारण पाहा! मी खास्द्यांची उठावनी करतो, ते भयानक व उतावळे राष्ट्र आहे. जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत. ते दारूण व भयंकर आहेत, त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासूनच पुढे जातात. त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात. ते सर्व हिंसा करण्यास येतात, त्यांचा जमाव वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे समोर जातो, आणि ते बंदिवानास वाळूप्रमाणे गोळा करतात! म्हणून ते राजांची थट्टा करतील, आणि राज्यकर्ते त्यांच्यासाठी केवळ चेष्टा असे आहेत! ते प्रत्येक दुर्गाला हसतात, कारण तो धुळीचा ढीग करून तो ताब्यात घेतात! मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील, त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे.”