उत्पत्ती 45:16-28
उत्पत्ती 45:16-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“योसेफाचे भाऊ त्याजकडे आले आहेत” अशी बातमी फारो, त्याच्या घरची मंडळी व त्याचे सेवक यांना समजली त्यामुळे त्या सर्वांना आनंद झाला. तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा. तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’ तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या. तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’” तेव्हा इस्राएलाच्या मुलांनी तसे केले. योसेफाने त्यांना फारोने आज्ञा दिल्याप्रमाणे गाड्या दिल्या, आणि त्यांच्या प्रवासाकरिता भरपूर अन्नसामग्री दिली. तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला व बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली. त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या. मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.” अशा रीतीने त्याचे भाऊ मिसर सोडून कनान देशास आपला पिता याकोब याच्याकडे गेले. त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला. इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.”
उत्पत्ती 45:16-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योसेफाचे भाऊ आले आहेत ही बातमी फारोहपर्यंत पोहोचली, तेव्हा ती ऐकून फारोहला आणि त्याच्या अधिकार्यांना अतिशय आनंद झाला. फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा, आणि तुमचे वडील व सर्व कुटुंबीय मंडळी यांना इजिप्तमध्येच राहण्यासाठी घेऊन या. त्यांना सांगा, फारोह तुम्हाला इजिप्त देशातील सर्वात सुपीक प्रदेश बहाल करेल म्हणजे या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खावयास मिळतील.’ “आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा. तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ” इस्राएलच्या पुत्रांनी तसेच केले. फारोहच्या आज्ञेप्रमाणे योसेफाने त्यांना सामान आणण्यासाठी गाड्या दिल्या; तसेच प्रवासासाठी अन्नधान्यही दिले. त्याने त्या प्रत्येकाला नवीन पोशाख दिला, परंतु बिन्यामीनाला त्याने पाच नवीन पोशाख आणि तीनशे शेकेल चांदी दिली. त्याने आपल्या वडिलांसाठी इजिप्तमधील सर्वोत्तम वस्तूंनी लादलेली दहा गाढवे पाठवली. प्रवासासाठी धान्य व खाद्यपदार्थ यांनी लादलेल्या दहा गाढवीही रवाना केल्या. अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!” निरोप घेऊन ते इजिप्तमधून निघाले व कनान देशात आपले वडील याकोब याच्याकडे आले. ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना. परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले. आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.”
उत्पत्ती 45:16-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला. फारो योसेफाला म्हणाला, “तू आपल्या भावांना सांग, एवढे करा की, आपली जनावरे लादून निघा व कनान देशाला जा; आणि आपला बाप व आपली मुलेमाणसे ह्यांना घेऊन माझ्याकडे या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हांला देईन व ह्या देशातले उत्तम पदार्थ तुम्हांला खायला मिळतील. आता तुला माझी आज्ञा आहे की, तुम्ही एवढे करा : आपल्या बायकामुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापालाही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.” इस्राएलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकुमाप्रमाणे योसेफाने त्यांना गाड्या व वाटेची शिधासामग्री दिली. त्याने प्रत्येकाला एकेक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनाला तीनशे रुपये आणि पाच नवे पोशाख दिले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेली दहा गाढवे आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री ह्यांनी लादलेल्या दहा गाढवी रवाना केल्या. ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.” ते मिसरातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना. मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.”