योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहचली. ती ऐकून फारोला व त्याच्या चाकरांना आनंद झाला. फारो योसेफाला म्हणाला, “तू आपल्या भावांना सांग, एवढे करा की, आपली जनावरे लादून निघा व कनान देशाला जा; आणि आपला बाप व आपली मुलेमाणसे ह्यांना घेऊन माझ्याकडे या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हांला देईन व ह्या देशातले उत्तम पदार्थ तुम्हांला खायला मिळतील. आता तुला माझी आज्ञा आहे की, तुम्ही एवढे करा : आपल्या बायकामुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापालाही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.” इस्राएलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकुमाप्रमाणे योसेफाने त्यांना गाड्या व वाटेची शिधासामग्री दिली. त्याने प्रत्येकाला एकेक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनाला तीनशे रुपये आणि पाच नवे पोशाख दिले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेली दहा गाढवे आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री ह्यांनी लादलेल्या दहा गाढवी रवाना केल्या. ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.” ते मिसरातून निघून वर कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना. मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.”
उत्पत्ती 45 वाचा
ऐका उत्पत्ती 45
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 45:16-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ