उत्पत्ती 41:46-57
उत्पत्ती 41:46-57 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली. सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले. योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले. योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की, त्याने मोजणे सोडले कारण ते मोजमाप करता येत नव्हते. दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला, आसनथ जी ओनचा याजक पोटीफर याची मुलगी तिच्या पोटी दोन पुत्र झाले. योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले. कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला.” त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, “माझ्या दुःखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतींत सफल केले.” मिसरमध्ये असलेली भरपुरीची, सुबत्तेची सात वर्षे संपली. सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते. दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांस म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.” संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांस धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता. सर्व पृथ्वीवरील देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता.
उत्पत्ती 41:46-57 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला. पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले. या समृद्धीच्या सात वर्षांच्या काळात योसेफाने इजिप्तमध्ये प्रत्येक शहराच्या भोवताली असलेल्या शेतात जे अन्नधान्य पिकले ते सर्व त्याने त्या भागाच्या जवळ असलेल्या शहरात साठवून ठेवले. योसेफाने समुद्राच्या वाळूप्रमाणे धान्याचा मोठा साठा केला; ते इतके होते की त्याने नोंदी ठेवणे बंद केले, कारण ते मोजण्यापलीकडे होते. याकाळात, दुष्काळाची वर्षे येण्यापूर्वी योसेफाला ओन येथील याजक पोटीफेराची कन्या आसनथ हिच्या पोटी दोन पुत्र झाले. योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव एफ्राईम असे ठेवले आले. कारण योसेफ म्हणाला, “परमेश्वराने माझ्या यातनेच्या या देशामध्ये मला फलद्रूप केले आहे.” इजिप्त देशातील समृद्धीची सात वर्षे संपत आली. मग योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली. इजिप्त देशाच्या सभोवती असलेल्या सर्व देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडला; परंतु इजिप्तमध्ये अन्न होते. इजिप्ती लोकांची उपासमार होऊ लागली, तेव्हा लोक फारोहजवळ अन्न मागू लागले आणि फारोहने त्यांना योसेफाकडे पाठविले व त्यांना सांगितले, “योसेफ सांगेल त्याप्रमाणे करा.” तेव्हा आता सर्व देशभर दुष्काळ पसरला असताना योसेफाने धान्याची कोठारे उघडली आणि तो इजिप्त देशाच्या लोकांना धान्य विकू लागला, कारण इजिप्तचा दुष्काळ अत्यंत भयानक होता. जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले.
उत्पत्ती 41:46-57 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले. त्याने ह्या सात वर्षांत मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली; एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेवले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला; त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफाला दोन मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे.” त्याने दुसर्याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.” मिसर देशातल्या सुकाळाची सात वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली, तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोकडे अन्नासाठी ओरड करू लागले, तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांना म्हणाला, “योसेफाकडे जा; तो तुम्हांला सांगेल ते करा.” दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली, आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांना धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण सार्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता.