उत्पत्ती 41:28-40
उत्पत्ती 41:28-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे. तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे. फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा. अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही.” हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?” तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही. तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
उत्पत्ती 41:28-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे. पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल. पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल. तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत. आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील. “म्हणून आता फारोहने एक सुज्ञ आणि शहाणा मनुष्य शोधला पाहिजे आणि त्याला इजिप्त देशावर अधिकारी केले पाहिजे. फारोह राजाने इजिप्त देशावर अधिकार्यांची नेमणूक करून सात वर्षांच्या समृद्धीच्या काळात सर्व वरकड धान्याचा पाचवा भाग गोळा करावा. समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे. ही सर्व अन्नसामुग्री राखीव म्हणून संपूर्ण देशाकरिता साठवून ठेवल्यास नंतर दुष्काळाची सात वर्षे इजिप्त देशावर आली म्हणजे खाण्यासाठी पुरेसे अन्नधान्य राहील, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्यांना ही योजना योग्य वाटली. फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?” मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही. म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
उत्पत्ती 41:28-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत; आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे; आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या सात वर्षांत मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. ह्या येणार्या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी सात वर्षे येणार त्यांसाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?” मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.”