YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:1-45

उत्पत्ती 41:1-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्‍यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली; आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली. त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला, “माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्‍यांच्या नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली; तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता, त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हांला सांगितला; त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हांला अर्थ सांगितला तसेच घडून आले; मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले.” मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला. फारो योसेफाला म्हणाला, “मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस?” योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.” नंतर फारोने योसेफाला सांगितले, “पाहा, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो; तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्‍या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्‍या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना; पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली; आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली; आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.” योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे. त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या सात रोड व कुरूप गाई आणि सुकलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली सात कणसे ही दुष्काळाची सात वर्षे होत. मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत; आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे; आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या सात वर्षांत मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. ह्या येणार्‍या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी सात वर्षे येणार त्यांसाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?” मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.” फारो योसेफाला आणखी म्हणाला, “हे पाहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.” मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली; मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.” फारोने योसेफाचे नाव सापनाथ-पानेह असे ठेवले; आणि ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला.

सामायिक करा
उत्पत्ती 41 वाचा

उत्पत्ती 41:1-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या. त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या. आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला. मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली. नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही. तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे. फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते. तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली. तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.” मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.” मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो. त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली. बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.” मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे. तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे. फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा. अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही.” हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?” तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही. तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.” मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली. नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्यास सर्व देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो आहे, आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही.” फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.

सामायिक करा
उत्पत्ती 41 वाचा