YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 39:1-12

उत्पत्ती 39:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले. परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे. परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले. तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता. पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता. काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, “माझ्याबरोबर प्रेम कर.” परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे. या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?” ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला. एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचा

उत्पत्ती 39:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इकडे योसेफाला इजिप्तमध्ये आणले. फारोह अंमलदार व अंगरक्षकांचा प्रमुख पोटीफराने इश्माएली लोकांपासून योसेफास विकत घेतले. याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे. पोटीफराने पाहिले की याहवेह योसेफाबरोबर आहेत आणि जे काही तो करतो त्यामध्ये याहवेह त्याला यश देतात, त्यामुळे साहजिकच योसेफ त्याचा आवडता झाला व त्याचा व्यक्तिगत सेवक बनला. लवकरच पोटीफराच्या घराची व्यवस्था व त्याचे सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात देण्यात आले. जेव्हापासून त्याने योसेफाला त्याच्या घरावर, व त्याचे जे काहीही होते त्या सर्वांवर अधिकारी म्हणून नेमले, तेव्हापासून योसेफामुळे याहवेहने त्या इजिप्तच्या धन्याला आशीर्वादित केले; पोटीफराचे जे काही होते, त्याचे कुटुंब व शेती यावर याहवेहचा आशीर्वाद होता. म्हणून पोटीफराने आपले सर्वकाही योसेफाला सोपवून दिले. आपण काय खावे यापलीकडे त्याने कशाचीच काळजी केली नाही. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. काही वेळेनंतर योसेफ पोटीफराच्या पत्नीच्या डोळ्यात भरला व ती त्याला म्हणाली, “माझ्याशी समागम कर!” योसेफाने तिला नाकारले. तो तिला म्हणाला. “हे पाहा, मी कारभारी असताना माझे धनी या घरातील कोणत्याही गोष्टीची काळजी करीत नाही, त्यांच्या मालकीचे सर्वकाही त्यांनी माझ्या हाती सोपविले आहे. या घरामधे मला सर्वांपेक्षा अधिक अधिकार आहेत. तुम्ही त्यांची पत्नी आहात, तुम्हाला वगळून इतर प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्या हाती दिली आहे. तेव्हा असे दुष्कर्म मला कसे करता येईल? ते परमेश्वराविरुद्ध एक घोर पातक ठरेल.” ती दिवसेंदिवस योसेफाला आग्रह करीत असली तरी त्याने तिच्यासोबत निजण्यास किंवा तिच्या सहवासात असण्याचे नाकारले. एके दिवशी असे घडून आले की, तो कामानिमित्त घराच्या आत आला असताना, घरात दुसरे कोणतेही सेवक नव्हते; तिने त्याच्या झग्याला पकडले आणि म्हणाली, “माझ्याबरोबर नीज!” पण त्याने त्याचा झगा तिच्या हातातच सोडला आणि घराबाहेर पळाला.

सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचा

उत्पत्ती 39:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्‍याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली; योसेफ त्याची सेवा करू लागला; आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले. आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्‍याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्वकाही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, “माझ्यापाशी नीज.” पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला, त्या वेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, “माझ्यापाशी नीज.” पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 39 वाचा