YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्प. 39:1-12

उत्प. 39:1-12 IRVMAR

योसेफाला खाली मिसरात आणले. फारो राजाचा एक मिसरी अधिकारी, संरक्षक दलाचा सरदार पोटीफर, याने त्यास इश्माएली लोकांकडून विकत घेतले. परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे. परमेश्वर देव त्याच्याबरोबर आहे आणि म्हणून जे काही तो करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर देव त्यास यश देतो, हे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने पोटीफराची सेवा केली. पोटीफराने योसेफाला आपल्या घराचा कारभारी केले आणि त्याचे जे काही स्वतःचे होते ते सर्व त्याच्या ताब्यात दिले. तेव्हा त्याने आपल्या घरात आणि आपले जे काही होते त्या सर्वावर योसेफाला कारभारी केले तेव्हापासून परमेश्वराने योसेफामुळे त्या मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिला. घरात व शेतीत जे काही पोटीफराच्या मालकीचे होते त्या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद होता. पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला. तो जे अन्न खात असे, त्या पलीकडे कशाचाही तो विचार करत नव्हता. योसेफ फार देखणा व आकर्षक होता. काही काळानंतर त्याच्या धन्याच्या पत्नीला योसेफाविषयी वासना निर्माण झाली. ती म्हणाली, “माझ्याबरोबर प्रेम कर.” परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे. या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी दुष्टाई मी कशी करू?” ती दररोज योसेफाबरोबर तेच बोलत असे, परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास व प्रेम करण्यास नकार दिला. एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.