उत्पत्ती 32:13-21
उत्पत्ती 32:13-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली. त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली. त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’” याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हास जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.” तुम्ही असेही म्हणावे की, “आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.” त्याने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसावाचा राग शांत होईल. त्यानंतर जेव्हा मी त्यास भेटेन, तेव्हा कदाचित तो माझा स्विकार करील.” म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वतः त्या रात्री तळावर मागेच राहिला.
उत्पत्ती 32:13-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.” पहिला कळप नेणार्या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ” याकोबाने दुसर्या, तिसर्या आणि इतर कळप हाकणार्याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.” म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.
उत्पत्ती 32:13-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली; दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे, ह्या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एकेक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, “तुम्ही कळपाकळपांत अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा.” त्याने सर्वांत पुढच्या चाकराला सांगितले की, “माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारील की तू कोणाचा? कोठे चाललास? आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची?” तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.” मग दुसर्याला, तिसर्याला आणि इतर सर्व कळप हाकून नेणार्यांना अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की, “तुम्हांला एसाव भेटला तर असेच बोला, आणि सांगा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे.” याकोबाला वाटले की, पुढे भेट पाठवून त्याला शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील. ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला.