YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:1-12

उत्पत्ती 32:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले. जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम ठेवले. याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले. त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो. माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’” निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.” तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या. तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.” याकोब म्हणाला, “माझा बाप अब्राहाम याच्या देवा, आणि माझा बाप इसहाक याच्या देवा, परमेश्वर देवा, तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस. तसेच तू माझी भरभराट केलीस, तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत. कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते. परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’”

सामायिक करा
उत्पत्ती 32 वाचा

उत्पत्ती 32:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले. जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले. याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले; आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो. आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.” निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.” हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये विभागणी केली. त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्‍या गटाला कदाचित निसटून जाता येईल.” मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे. तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत. तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल. परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.”

सामायिक करा
उत्पत्ती 32 वाचा

उत्पत्ती 32:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले. त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले. मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले. त्यांना त्याने आज्ञा दिली की, “माझा स्वामी एसाव ह्याला जाऊन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाकडे उपरा असा जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप, दास व दासी आहेत; माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवीत आहे.” जासुदांनी परत येऊन याकोबाला सांगितले, “आम्ही आपला भाऊ एसाव ह्याला जाऊन भेटलो; तो आपल्याला भेटायला येत आहे, त्याच्याबरोबर चारशे माणसे आहेत.” तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तो म्हणाला, “एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल.” मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”

सामायिक करा
उत्पत्ती 32 वाचा