YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:1-12

उत्पत्ती 32:1-12 MARVBSI

इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले. त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले. मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले. त्यांना त्याने आज्ञा दिली की, “माझा स्वामी एसाव ह्याला जाऊन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाकडे उपरा असा जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप, दास व दासी आहेत; माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवीत आहे.” जासुदांनी परत येऊन याकोबाला सांगितले, “आम्ही आपला भाऊ एसाव ह्याला जाऊन भेटलो; तो आपल्याला भेटायला येत आहे, त्याच्याबरोबर चारशे माणसे आहेत.” तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडेमेंढरे, गुरे व उंट ह्यांच्या त्याने दोन टोळ्या केल्या. तो म्हणाला, “एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल.” मग याकोब म्हणाला, “हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहाम व इसहाक ह्यांच्या देवा, तू मला सांगितलेस की, तू आपल्या देशास, आपल्या भाऊबंदांत परत जा; मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव ह्याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो; मला भीती वाटते की, तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. तू मला वचन दिले आहेस की, मी तुझे निश्‍चित कल्याण करीन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन.”