YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 31:17-55

उत्पत्ती 31:17-55 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले. तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही. याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले. तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते. तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे. खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’ तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?” याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला. राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत. ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत. मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात? माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील. मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती. वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला. परंतु माझ्या पूर्वजांचा देव; अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा देव ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले.” लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो? म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला. याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले. जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.” लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये. अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली. मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा

उत्पत्ती 31:17-55 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला. जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या. याकोब अरामी लाबानाला काहीही न सांगता त्याला फसवून पळाला. अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले. याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्‍या दिवशी सांगण्यात आले. तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.” लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला. लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस? असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती? माझ्या नातवंडाचा निरोप घेण्यापूर्वी, तू मला त्यांची चुंबने देखील घेऊ दिली नाहीस. ही मूर्खपणाची वागणूक आहे. मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’ आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?” याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल. पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते. लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला. आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत. राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही. तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात? माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या. “वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले. माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे. अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला. जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.” यावर लाबानाने याकोबास उत्तर दिले, “या स्त्रिया माझ्या मुली आहेत; ही मुलेबाळेही माझी आहेत; हे कळप व तुझे जे आहे ते सर्व माझेच आहे. तेव्हा माझ्या कन्या व त्यांची संतती यांचे मी आता करू? तर चल, आपण दोघे म्हणजे तू आणि मी शांतीचा करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो.” तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला; आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले. मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद असे नाव दिले. लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. यावरून तिला मिस्पाह असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.” तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.” लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे. हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे. अब्राहामाचे परमेश्वर आणि नाहोराचे परमेश्वर आणि त्याच्या पित्याचे परमेश्वर, आमच्यामध्ये न्याय करोत.” मग याकोबाने त्याचे वडील इसहाकाला ज्यांचे भय होते त्यांच्या नावाने शपथ घेतली. नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली. लाबान दुसर्‍या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा

उत्पत्ती 31:17-55 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका ह्यांना उंटांवर बसवले; आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन-अरामात मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक ह्याच्याकडे कनान देशास जायला निघाला. लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या. ह्याप्रमाणे याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण पळून जात आहोत हे त्याने त्याला कळू दिले नाही. मग तो आपले सर्वकाही घेऊन पळून गेला; तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखवला. याकोब पळून गेला हे तिसर्‍या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले. तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा सात दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठले. देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.” लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला. मग लाबान याकोबाला म्हणाला, “तू हे काय केलेस? तू मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास. तू चोरून पळालास, मला फसवलेस, काही कळू दिले नाहीस, असे का केलेस? तू मला कळवले असतेस तर मी आनंदाने गाणेबजावणे करून, डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते. तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाहीस; हा सर्व तू मूर्खपणा केलास. तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की, सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस. बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्यास?” तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटली; मी म्हणालो, कोण जाणे आपण माझ्याकडून आपल्या मुली हिरावून घ्याल. आपल्या देवता ज्याच्याजवळ सापडतील तो जिवंत राहायचा नाही; आपण आपल्या भाऊबंदांदेखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या.” कारण राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते. तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्‍यात, लेआच्या डेर्‍यात आणि त्या दोन दासींच्या डेर्‍यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्‍यातून राहेलीच्या डेर्‍यात गेला. राहेल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाळीत ठेवून त्यांवर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला पण त्याला काही सापडले नाही. ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत. तेव्हा याकोब रागावला. लाबानाशी तक्रार करू लागला; याकोबाने लाबानाला म्हटले, “आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली त्यांत आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या ह्या माझ्या व आपल्या भाऊबंदांसमोर ठेवा; म्हणजे त्यांना आपल्या दोघांचा निवाडा करता येईल. आज वीस वर्षें मी आपल्याजवळ राहिलो; इतक्या काळात आपल्या शेळ्यामेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरून दिली; दिवसा-रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतलीत. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती. गेली वीस वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. माझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक’ (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.” ह्यावर लाबान याकोबाला म्हणाला, “ह्या मुली माझ्या मुली आहेत, आणि ही मुले माझी मुले आहेत; हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे; आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले ह्यांना मी काय करू? तर चल, तू आणि मी आपसात करार करू; आणि तो तुझ्यामाझ्यामध्ये साक्ष होवो.” तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला. मग याकोब आपल्या भाऊबंदांना म्हणाला, “धोंडे जमा करा,” आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली; आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर-सहदूथा (अरेमाईक भाषेत साक्षीची रास) म्हटले व याकोबाने तिला गलेद (हीब्रू भाषेत साक्षीची रास) म्हटले. लाबान म्हणाला, “आता ही रास तुझ्यामाझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव ‘गलेद’ ठेवले.” तसेच ‘मिस्पा’ हेही नाव तिला दिले; तो म्हणाला, “कारण आपण परस्परांच्या दृष्टिआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा-माझा साक्षी असो. तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.” लाबान याकोबाला आणखी म्हणाला, “पाहा, तुझ्यामाझ्यामध्ये ही रास व हा स्तंभ मी उभा केला आहे. ही रास व हा स्तंभ साक्षी असो; अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही. तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नयेस. अब्राहामाचा देव, नाहोराचा देव व त्यांच्या पित्याचे1 देव आपल्या दोघांचा न्याय करोत.” मग याकोबाने आपला बाप इसहाक ह्याचा जो ‘धाक’ त्याची शपथ वाहिली. नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली. लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.

सामायिक करा
उत्पत्ती 31 वाचा