YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 29:11-35

उत्पत्ती 29:11-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला. याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले. जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या. मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला. लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?” लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल. लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती. याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.” म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.” तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली. त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली. सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?” लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही. या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.” त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली; लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली. तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली. परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती. लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.” लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले. लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले. त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुल होण्याचे थांबले.

सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा

उत्पत्ती 29:11-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावत त्याला सामोरा गेला. त्याला आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली; त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तान्त कथन केला. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” याकोब त्याच्याकडे महिनाभर राहिला. त्यानंतर लाबान त्याला म्हणाला, “तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावीस की काय? तुझे वेतन काय ते मला सांग.” लाबानास दोन मुली होत्या; वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती. याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, “आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.” ह्यावर लाबान म्हणाला, “ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे; तू माझ्याकडे राहा.” तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या म्हणजे मी तिच्यापाशी जाईन.” मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?” त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला; लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी सात वर्षे त्याच्याकडे राहून त्याची चाकरी केली. परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.” ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, “आता मी परमेश्वराचे स्तवन करीन;” ह्यावरून तिने त्याचे नाव ‘यहूदा’ ठेवले, पुढे तिचे जनन थांबले.

सामायिक करा
उत्पत्ती 29 वाचा