मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावत त्याला सामोरा गेला. त्याला आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली; त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तान्त कथन केला. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” याकोब त्याच्याकडे महिनाभर राहिला. त्यानंतर लाबान त्याला म्हणाला, “तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावीस की काय? तुझे वेतन काय ते मला सांग.” लाबानास दोन मुली होत्या; वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल. लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती. याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, “आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.” ह्यावर लाबान म्हणाला, “ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे; तू माझ्याकडे राहा.” तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या म्हणजे मी तिच्यापाशी जाईन.” मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?” त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.” याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला; लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी सात वर्षे त्याच्याकडे राहून त्याची चाकरी केली. परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.” ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले. ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, “आता मी परमेश्वराचे स्तवन करीन;” ह्यावरून तिने त्याचे नाव ‘यहूदा’ ठेवले, पुढे तिचे जनन थांबले.
उत्पत्ती 29 वाचा
ऐका उत्पत्ती 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 29:11-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ