YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 27:30-46

उत्पत्ती 27:30-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला. त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.” इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.” मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.” जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.” इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.” एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.” एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला! मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल. तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.” त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.” रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे. म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा. तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा. तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?” मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”

सामायिक करा
उत्पत्ती 27 वाचा

उत्पत्ती 27:30-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.” हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.” त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.” जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.” परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.” यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्‍यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?” एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला. त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल. तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.” एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.” परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे. तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा. तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा. तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?” नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”

सामायिक करा
उत्पत्ती 27 वाचा

उत्पत्ती 27:30-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. त्यानेही रुचकर पक्वान्न तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्याला म्हटले, “माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे, आणि मला आशीर्वाद द्यावा.” हे ऐकून त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण?” त्याने म्हटले, “मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव.” तेव्हा इसहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, “तर पारध करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन माझ्याकडे जो आला, आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्याला आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच.” एसावाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दु:खाने हंबरडा फोडून आपल्या बापाला म्हणाला, “बाबा, मलाही आशीर्वाद द्या.” तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळायचा तो आशीर्वाद घेऊन गेला.” तेव्हा एसाव म्हणाला, “त्याला याकोब (युक्तीने हिरावून घेणारा) हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? कारण त्याने दोनदा मला दगा दिला; त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतलाच व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला; तर आपण माझ्यासाठी काहीच आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, “पाहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे, त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षारस ह्यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे; तर माझ्या मुला, आता तुझ्यासाठी मी काय करू?” एसाव बापाला म्हणाला, “आपल्याजवळ एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मला, मलाही आशीर्वाद द्या.” आणि एसाव हेल काढून रडला. तेव्हा त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “पाहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर वरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल; तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.” याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन. आपला वडील मुलगा एसाव ह्याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळवले तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला बोलावून म्हटले, “पाहा, तुला जिवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे. तर माझ्या बाळा, आता माझे ऐक; ऊठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे; त्याच्याकडे पळून जा, आणि तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याच्याकडे राहा; तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचा त्याला विसर पडेपर्यंत तेथे राहा; मग मी तुला तेथून बोलावणे पाठवून आणीन; एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे?” तेव्हा रिबका इसहाकाला म्हणाली, “ह्या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; ह्यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी बायको याकोबाने करून घेतली तर मला जगून काय लाभ?”

सामायिक करा
उत्पत्ती 27 वाचा