इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला. त्यानेही आपल्या वडिलाच्या आवडीचे रुचकर भोजन तयार करून आपल्या बापाजवळ आणले, तो त्याच्या बापाला म्हणाला, “माझ्या वडिलाने उठावे आणि तुमच्या मुलाने शिकार करून आणलेले मांस खावे जेणेकरून मला आशीर्वाद द्यावा.” इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.” मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.” जेव्हा एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले, तो खूप मोठ्याने ओरडून आणि दुःखाने रडून म्हणाला “माझ्या पित्या; मलाही आशीर्वाद द्या.” इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.” एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?” इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.” एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला! मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल. तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.” रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे. म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा. तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा. तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?” मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”