एज्रा 7:11-28
एज्रा 7:11-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही : “स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी; मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे; तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे; आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस; तसेच जेवढे सोने व रुपे सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावेस. तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत. जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा. तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर. ह्याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे. मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्चिमेकडील सर्व भांडार्यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे; रुपे शंभर किक्कारपर्यंत,1 गहू शंभर कोरपर्यंत,2 द्राक्षारस शंभर बथपर्यंत,2 तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे. जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील तिच्यानुसार स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे; राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे? तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही. हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे. जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.” यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य! राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.
एज्रा 7:11-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा अर्तहशश्ताने, एज्रा, जो याजक व जो परमेश्वर देवाने इस्राएलांस दिलेल्या नियमशास्त्राचा शिक्षक होता, त्यास दिलेला हा आदेश होय; “स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक व याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून, मी असा आदेश देत आहे की, माझ्या राज्यातील इस्राएल लोक आणि त्यांचे याजक व लेवी, यांच्यापैकी ज्या कोणाला तुझ्याबरोबर यरूशलेमेला जाण्याची इच्छा असेल, त्याने जावे. तुजजवळ जे देवाचे नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे यहूदा आणि यरूशलेम याविषयी तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात सल्लागार तुला पाठवत आहोत. इस्राएलचा देव ज्याचे घर यरूशलेममध्ये आहे. ज्याला तू सोनेचांदी स्वखुशीने अर्पण केले आहे. ते तू न्यावेस. जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरूशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे. या पैशातून तू बैल, मेंढे, कोकरे घे. तसेच त्या सोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणेही विकत घे. मग ती यरूशलेमेमधील तुमच्या देवाच्या मंदिरातील वेदीवर अर्पण कर. यातून उरलेल्या त्या सोन्यारुप्याचा वापर तू आणि तुझे भाऊबंद यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्या देवाला आवडेल तसा करा. तुमच्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी जी पात्रे दिली आहेत, ती तू यरूशलेमेस त्यापुढे सोपवून दे. देवाच्या मंदिरासाठी आणखी कश्याची गरज असेल जे तुला द्यावे लागेल तर ते तू माझ्या खजिन्यातून त्याचा खर्च कर. आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे, एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी शंभर किक्कारपर्यंत, गहू शंभर कोरपर्यंत, द्राक्षरस शंभर बथपर्यंत, तेल शंभर बथपर्यंत, अमर्याद मीठ द्यावे. स्वर्गीय देवाचा हा आदेश आहे, हे सर्व स्वर्गातील देवाच्या घरासाठी भक्तीने करावे. देवाचा माझ्यावर व माझ्या मुलांच्या राज्यावर कोप का होऊ द्यावा? आम्ही तुम्हास कळवतो की, मंदिरातील सर्व याजक, लेवी, गायक, द्वारपाल, मंदिरातील नेमलेले सेवेकरी आणि देवाच्या मंदिरातील सेवक यांच्याकडून कोणताही कर, खंडणी, जकात घेऊ नये. एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील. जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.” परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरूशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली. आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्राएलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.