एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही : “स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी; मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे; तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे; आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस; तसेच जेवढे सोने व रुपे सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावेस. तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत. जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा. तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर. ह्याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे. मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्चिमेकडील सर्व भांडार्यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे; रुपे शंभर किक्कारपर्यंत,1 गहू शंभर कोरपर्यंत,2 द्राक्षारस शंभर बथपर्यंत,2 तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे. जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील तिच्यानुसार स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे; राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे? तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही. हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे. जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.” यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य! राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.
एज्रा 7 वाचा
ऐका एज्रा 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एज्रा 7:11-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ