YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 37:15-28

यहेज्केल 37:15-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे. मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील. जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय? मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील. नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर. मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन. मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही. मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील. जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन. मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन बहुगुणीत करीन आणि मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन. माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”

सामायिक करा
यहेज्केल 37 वाचा

यहेज्केल 37:15-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू लाकडाचा एक ढलपा घेऊन त्यावर, ‘हा यहूदा व त्यांचे सोबती इस्राएल वंशज ह्यांचा,’ असे लिही; लाकडाचा दुसरा ढलपा घेऊन त्यावर, ‘हा योसेफाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्राएल घराणे ह्यांचा ढलपा,’ असे लिही. ते ढलपे एकास एक जोडून त्यांचा एक ढलपा कर; तुझ्या हाती ते एकजीव होतील असे कर. मग ‘ह्या ढलप्यांचा अर्थ काय हे आम्हांला तू सांगशील ना,’ असे तुझे बांधव तुला म्हणतील; तेव्हा त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, एफ्राइमाच्या हाती असलेला योसेफाचा ढलपा व त्याचे सोबती इस्राएल वंशज ह्यांना घेऊन यहूदाच्या ढलप्याशी जोडून त्यांचा एक ढलपा मी करीन, म्हणजे ते माझ्या हातात एकजीव होतील. मग ज्या ढलप्यांवर तू लिहिशील ते तू त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या हाती धर. तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलवंशज ज्या राष्ट्रांत गेले आहेत त्यांतून मी त्यांना काढून व चोहोंकडून गोळा करून स्वदेशी नेईन; मी ह्या देशात, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती ह्यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; ह्यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत. ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणांला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी1 पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल. माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल, त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल; ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्यांप्रमाणे वर्ततील. जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल. आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन. माझा निवासमंडप त्यांच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”

सामायिक करा
यहेज्केल 37 वाचा