यहेज्केल 37
37
शुष्क अस्थींचे खोरे
1परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या.
2त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या.
3मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.”
4तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका :
5प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल.
6मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
7मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला; मी संदेश देत असता आवाज झाला; आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या.
8मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता.
9तेव्हा तो मला म्हणाला, “वार्याला1 संदेश दे; मानवपुत्रा, वार्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वार्या, तू चोहो दिशांनी ये व ह्या वधलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील.”
10मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले.
11तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’
12म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पाहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हांला आपल्या कबरांतून बाहेर काढून इस्राएल देशात आणीन.
13माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हांला बाहेर काढीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
14मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
यहूदा व इस्राएल ह्यांच्या समेटाविषयी भविष्य
15परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की,
16“मानवपुत्रा, तू लाकडाचा एक ढलपा घेऊन त्यावर, ‘हा यहूदा व त्यांचे सोबती इस्राएल वंशज ह्यांचा,’ असे लिही; लाकडाचा दुसरा ढलपा घेऊन त्यावर, ‘हा योसेफाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्राएल घराणे ह्यांचा ढलपा,’ असे लिही.
17ते ढलपे एकास एक जोडून त्यांचा एक ढलपा कर; तुझ्या हाती ते एकजीव होतील असे कर.
18मग ‘ह्या ढलप्यांचा अर्थ काय हे आम्हांला तू सांगशील ना,’ असे तुझे बांधव तुला म्हणतील;
19तेव्हा त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, एफ्राइमाच्या हाती असलेला योसेफाचा ढलपा व त्याचे सोबती इस्राएल वंशज ह्यांना घेऊन यहूदाच्या ढलप्याशी जोडून त्यांचा एक ढलपा मी करीन, म्हणजे ते माझ्या हातात एकजीव होतील.
20मग ज्या ढलप्यांवर तू लिहिशील ते तू त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या हाती धर.
21तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलवंशज ज्या राष्ट्रांत गेले आहेत त्यांतून मी त्यांना काढून व चोहोंकडून गोळा करून स्वदेशी नेईन;
22मी ह्या देशात, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती ह्यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; ह्यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत.
23ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणांला विटाळणार नाहीत; त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी1 पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल.
24माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल, त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल; ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्यांप्रमाणे वर्ततील.
25जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल.
26आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.
27माझा निवासमंडप त्यांच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल.
28माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 37: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.