YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 32:7-35

निर्गम 32:7-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत; ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.” मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे. हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.” तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’ तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला. मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; त्या पाट्यांवर पुढच्या व मागच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे.” तो म्हणाला, “हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे, अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे.” मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातांतल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले. तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?” अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले ते आम्हांला कळत नाही.’ मी त्यांना सांगितले, ‘ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे; त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले; मग मी ते अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.”’ मोशेने पाहिले की, हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, “परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या कंबरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा.”’ मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोक पडले. कारण मोशे म्हणाला होता की, ‘आज आपल्याला परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हांला वरदान देईल.’ दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो; कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्‍चित्त मला करता येईल.” मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “हाय! हाय! ह्या लोकांनी घोर पातक केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “ज्या कोणी माझ्याविरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. माझा दूत तुझ्यापुढे चालेल; तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.” अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडन केले.

सामायिक करा
निर्गम 32 वाचा

निर्गम 32:7-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते त्या मार्गापासून किती लवकर ते बहकून गेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्यास बली अर्पणे वाहत आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएला, याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “या लोकांस मी पाहिले आहे; ते ताठ मानेचे लोक आहेत; तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो.” परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? आणि परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरून त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला. मग मोशे पर्वतावरून साक्षपटाच्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यावर पुढे व मागे अशा दोन्ही बाजूंना लिहिलेले होते. देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.” मोशेने उत्तर दिले, “एखाद्या सैन्याच्या विजयाचा हा आवाज नाही किंवा एखाद्या सैन्याच्या पराभवाचा हा आक्रोश नाही; मला जो आवाज ऐकू येत आहे तो नाचगाण्यांचा आहे.” मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. नंतर लोकांनी बनविलेले ते सोन्याचे वासरू मोशेने तोडून फोडून ते अग्नीत जाळले. व कुटून त्याची पूड केली; मग ती पाण्यात टाकली. नंतर ते पाणी त्याने इस्राएल लोकांस प्यायला दिले. मोशे अहरोनास म्हणाला, “या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?” अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला माहीत आहे. लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुमच्याकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.” मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला. तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे जमा झाले. मग मोशे त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर काय म्हणतो ते मी तुम्हास सांगतो, ‘प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकावावी आणि छावणीच्या या प्रवेशव्दारापासून त्या प्रवेशव्दारापर्यंत अवश्य जावे आणि प्रत्येक मनुष्याने आपला भाऊ, मित्र व शेजारी यांना अवश्य जिवे मारावे.” लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मरण पावले. मग मोशे म्हणाला, “आज आपणाला परमेश्वराकरता समर्पण करून प्रत्त्येक पुरुषाने आपल्या पुत्रावर व भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हास आशीर्वाद देईल.” दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.” तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले; तरी आता तू त्यांच्या या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे माझ्याविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो. तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांस घेऊन जा; माझा दूत तुझ्यापुढे चालेल व तुला मार्ग दाखवील. जेव्हा पाप केलेल्या लोकांस शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.” अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.

सामायिक करा
निर्गम 32 वाचा