YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 32

32
सोन्याचे वासरू
(अनु. 9:6-29)
1मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.”
2तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, “तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या.”
3मग सर्व लोकांनी आपल्या कानांतील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली.
4त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.”
5हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे.
6म्हणून दुसर्‍या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.
7तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत;
8ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”
9मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे. हे ताठ मानेचे लोक आहेत.
10तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.”
11तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?
12त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो.
13तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’
14तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.
15मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला; त्या पाट्यांवर पुढच्या व मागच्या अशा दोन्ही बाजूंना लिहिले होते.
16ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता.
17यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे.”
18तो म्हणाला, “हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे, अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे.”
19मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातांतल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
20तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.
21तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”
22अहरोन म्हणाला, “माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको; ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे.
23त्यांनी मला सांगितले की, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले ते आम्हांला कळत नाही.’
24मी त्यांना सांगितले, ‘ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे; त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले; मग मी ते अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.”’
25मोशेने पाहिले की, हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले.
26तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, “परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे.” तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले.
27तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या कंबरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा.”’
28मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोक पडले.
29कारण मोशे म्हणाला होता की, ‘आज आपल्याला परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हांला वरदान देईल.’
30दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो; कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्‍चित्त मला करता येईल.”
31मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “हाय! हाय! ह्या लोकांनी घोर पातक केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनवले.
32तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.”
33परमेश्वर मोशेला म्हणाला, “ज्या कोणी माझ्याविरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन.
34आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. माझा दूत तुझ्यापुढे चालेल; तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन.”
35अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडन केले.

सध्या निवडलेले:

निर्गम 32: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन