YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 18:7-27

निर्गम 18:7-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले. परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांस स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय. परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.” मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेसमोर उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?” मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो.” परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने. तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग. तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.” तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले. ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे. मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

सामायिक करा
निर्गम 18 वाचा

निर्गम 18:7-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा मोशे त्याच्या सासर्‍याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले. मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली. इजिप्तच्या लोकांच्या हातातून इस्राएलची सुटका करण्यासाठी याहवेहने जी चांगली कृत्ये केली, ती ऐकून इथ्रोला फार आनंद झाला. इथ्रो म्हणाला, “याहवेहचे नाव धन्यवादित असो, ज्यांनी तुला इजिप्त व फारोहच्या तावडीतून सोडविले आणि ज्यांनी लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातातून सोडविले. आता मला समजले की, याहवेह सर्व दैवतांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ज्यांनी इस्राएली लोकांना क्रूरतेने वागविले होते त्यांचा त्यांनी नाश केला आहे.” मग मोशेचा सासरा इथ्रोने परमेश्वरासाठी होमार्पण व इतर अर्पणे आणली आणि अहरोन व इस्राएली लोकांचे सर्व वडील मोशेच्या सासर्‍याबरोबर भोजन करावयास परमेश्वराच्या समक्षतेत आले. दुसर्‍या दिवशी मोशे इस्राएली लोकांचा न्याय करावयाला त्याच्या आसनावर बसला आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याभोवती उभे राहिले. जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, “हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?” मोशे त्याला म्हणाला, “कारण लोक परमेश्वराची इच्छा जाणावी म्हणून माझ्याकडे येतात. जेव्हा त्यांच्यात वाद होतात, ते माझ्याकडे आणतात आणि मी त्यांचा निर्णय करतो आणि त्यांना परमेश्वराचे विधी व नियम याबद्दल सांगतो.” मोशेच्या सासर्‍याने उत्तर दिले, “तू जे करतोस ते बरोबर नाही. तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही. तर आता तू माझे ऐक आणि मी तुला सल्ला देतो आणि परमेश्वर तुझ्याबरोबर असो. तू परमेश्वरासमोर या लोकांचा प्रतिनिधी म्हणून राहा आणि त्यांचे वाद परमेश्वरासमोर आण. परमेश्वराचे विधी व नियम त्यांना शिकव आणि ज्या मार्गाने त्यांनी चालावे आणि त्यांचे वर्तन कसे असावे हे त्यांना दाखव. पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील. जर तू असे केले आणि परमेश्वराने तुला आज्ञा केली, तर तुला सोपे जाईल आणि हे लोकसुद्धा समाधानी होऊन घरी जातील.” मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले. मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले. त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले. मग मोशेने आपल्या सासर्‍याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.

सामायिक करा
निर्गम 18 वाचा

निर्गम 18:7-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले. परमेश्वराने इस्राएलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपल्याला काय काय त्रास भोगावा लागला, आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली ही सर्व हकिकत मोशेने आपल्या सासर्‍याला कळवली. परमेश्वराने इस्राएलांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवून त्यांचे जे कल्याण केले त्या सर्वांबद्दल इथ्रोला आनंद वाटला. इथ्रो म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुम्हांला मिसर्‍यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिसर्‍यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय! आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.” मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला. दुसर्‍या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासर्‍याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?” मोशे आपल्या सासर्‍याला म्हणाला, “लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात; त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो.” मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “तू करीत आहेस ते काही ठीक नाही. तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही. तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने. विधी व नियम त्यांना शिकव. आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना दाखवत जा. तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव; त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल, आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील.” मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले. त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले. ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत. मग मोशेने आपल्या सासर्‍याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.

सामायिक करा
निर्गम 18 वाचा