निर्गम 18:13-27
निर्गम 18:13-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेसमोर उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?” मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो.” परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही. तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही. तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने. तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग. तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम. या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.” तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले. मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले. ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे. मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
निर्गम 18:13-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुसर्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासर्याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?” मोशे आपल्या सासर्याला म्हणाला, “लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात; त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो.” मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “तू करीत आहेस ते काही ठीक नाही. तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही. तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने. विधी व नियम त्यांना शिकव. आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना दाखवत जा. तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव; त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल, आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील.” मोशेने आपल्या सासर्याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले. त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले. ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत. मग मोशेने आपल्या सासर्याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.