इफिसकरांस पत्र 5:21-33
इफिसकरांस पत्र 5:21-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल. याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
इफिसकरांस पत्र 5:21-33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा. पत्नींनो, जसे तुम्ही प्रभुच्या अधीन राहता, तसेच तुम्ही स्वतः तुमच्या पतीच्या अधीन असा. कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे. आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे. पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; आणि एक निष्कलंक व सुरकुतलेली नसून, सर्व दोषरहित, पवित्र व गौरवशाली अशी मंडळी त्यांना सादर केली जावी. याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीची संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो. कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत. “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.
इफिसकरांस पत्र 5:21-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे आहोत] आहोत. “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.
इफिसकरांस पत्र 5:21-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा. जसा ख्रिस्त हा ख्रिस्तमंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त हाच ख्रिस्तमंडळीचा म्हणजेच त्यांच्या शरीराचा तारणारा आहे. म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले. अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा. अशा प्रकारे पतीने त्याची पत्नी त्याचेच शरीर आहे, असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, अगदी ख्रिस्त ख्रिस्तमंडळीचे पालनपोषण करतो तसे; कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’ हे रहस्य महान आहे पण मी ख्रिस्त व ख्रिस्तमंडळी ह्यांच्याविषयी बोलत आहे. तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.