इफिसकरांस पत्र 5:1-33
इफिसकरांस पत्र 5:1-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला. जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.” म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या. आणि द्राक्षरस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका; त्यामुळे तो नाशाकडे जातो, परंतु उलट पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरले जा, सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल. याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
इफिसकरांस पत्र 5:1-33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी सुगंधी अर्पण व यज्ञ म्हणून परमेश्वराला दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीच्या मार्गाने चाला. तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत. आणि अश्लिलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी. तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभुमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या. अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.” म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. मुर्खासारखे वागू नका, तर प्रभुची इच्छा काय आहे ते समजून घ्या. मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गीते आणि गाणी गाऊन एकमेकांशी बोला. भजन गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभुची स्तुती करा. आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना. ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा. पत्नींनो, जसे तुम्ही प्रभुच्या अधीन राहता, तसेच तुम्ही स्वतः तुमच्या पतीच्या अधीन असा. कारण ज्याप्रमाणे पती हा पत्नीचे मस्तक आहे, तर ख्रिस्त हा त्यांचे शरीर म्हणजे, मंडळीचे मस्तक, तिचा तो उद्धारकर्ता आहे. आता मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन राहते, तसेच पत्नींनी सुद्धा प्रत्येक बाबतीत त्यांच्या पतीच्या अधीन राहवे. पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; आणि एक निष्कलंक व सुरकुतलेली नसून, सर्व दोषरहित, पवित्र व गौरवशाली अशी मंडळी त्यांना सादर केली जावी. याचप्रमाणे पतींनीही त्यांच्या पत्नीवर, त्या आपलेच शरीर आहेत, असे समजून प्रीती करावी. जो त्याच्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधीही स्वतःच्याच शरीराचा द्वेष केला नाही, परंतु ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीची संगोपन करून काळजी घेतात त्याप्रमाणे करतो. कारण आपण त्यांच्या शरीराचे अवयव आहोत. “या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” हे गूढ रहस्य आहे, परंतु मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.
इफिसकरांस पत्र 5:1-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका; कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा; कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2 म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा; आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे आहोत] आहोत. “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.
इफिसकरांस पत्र 5:1-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. पवित्र जनांमध्ये उचित ठरते त्याप्रमाणे लैंगिक अनैतिकता, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचा उल्लेखसुद्धा तुमच्यामधे केला जाऊ नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही तुमच्यामध्ये उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा तुम्ही देवाचे आभार मानत राहा. लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते. प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या. अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा. त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे. प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते. कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत. तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे, हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, भक्तिगीते व अध्यात्मिक गाणी तुमच्यामध्ये गात राहून तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूसाठी गायन-वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याला धन्यवाद देत जा. ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा. जसा ख्रिस्त हा ख्रिस्तमंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त हाच ख्रिस्तमंडळीचा म्हणजेच त्यांच्या शरीराचा तारणारा आहे. म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले. अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा. अशा प्रकारे पतीने त्याची पत्नी त्याचेच शरीर आहे, असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, अगदी ख्रिस्त ख्रिस्तमंडळीचे पालनपोषण करतो तसे; कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’ हे रहस्य महान आहे पण मी ख्रिस्त व ख्रिस्तमंडळी ह्यांच्याविषयी बोलत आहे. तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.