इफिसकरांस पत्र 4:17-32
इफिसकरांस पत्र 4:17-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत. त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही ख्रिस्ताबद्दल अशाप्रकारे शिकला नाही. जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे, आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा. ‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. सैतानाला संधी देऊ नका. जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्यास त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात. सर्व प्रकारची कटूता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:17-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रभुच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका. कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत. सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत. पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका. चोरी करणार्यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजू लोकांना देण्याकरीता त्यांच्याजवळ काहीतरी असेल. आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात. सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:17-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये; त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत; ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल; ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे; आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे; आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत; आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:17-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याच्याविषयी निश्चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले. म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा. तुम्ही नव्या मनोवृत्तीचा स्वीकार करा आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा. लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहां. प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा. उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.