YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांना 4:17-32

इफिसकरांना 4:17-32 MACLBSI

प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याच्याविषयी निश्‍चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले. म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा. तुम्ही नव्या मनोवृत्तीचा स्वीकार करा आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा. लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहां. प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा. उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.