YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 8:10-20

अनुवाद 8:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे. सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा. त्यामुळे तुम्हास अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. तुम्ही चांगली घरे बांधून त्यामध्ये रहाल. तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वर याला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हास खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हास नम्र केले. हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका. तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हास हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे. तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरू नका. त्यांची पूजी किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच आहे, ही ताकीद मी आताच तुम्हास देऊन ठेवतो. ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.

सामायिक करा
अनुवाद 8 वाचा

अनुवाद 8:10-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा. परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल. कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल, तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले. त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे. तुम्ही आपल्या मनात म्हणाल, “माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने मी हे धन मिळविले आहे.” परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात. परंतु जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल, त्यांना सोडून इतर दैवतांच्या मागे लागाल आणि त्यांची उपासना कराल व त्यांना नमन कराल, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो की, तुम्ही खात्रीने नाश पावाल. याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल.

सामायिक करा
अनुवाद 8 वाचा

अनुवाद 8:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि रुक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले; त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले; तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तसेच ‘हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे’ असे तू मनात म्हणू नकोस; पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला विसरून अन्य देवांच्या मागे लागाल, त्यांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर खात्रीने तुमचा नाश होईल हे मी तुम्हांला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यादेखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.

सामायिक करा
अनुवाद 8 वाचा