YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 8:10-20

अनुवाद 8:10-20 MRCV

जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा. परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल. कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल, तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले. त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे. तुम्ही आपल्या मनात म्हणाल, “माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने मी हे धन मिळविले आहे.” परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात. परंतु जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल, त्यांना सोडून इतर दैवतांच्या मागे लागाल आणि त्यांची उपासना कराल व त्यांना नमन कराल, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो की, तुम्ही खात्रीने नाश पावाल. याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल.

अनुवाद 8 वाचा