YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 7:1-12

अनुवाद 7:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका. त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका. कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका. कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो. पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील.

सामायिक करा
अनुवाद 7 वाचा

अनुवाद 7:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील— आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका. तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका, कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील. तुम्ही त्यांच्या बाबतीत हे करा: त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा, त्यांचे अशेराचे स्तंभ तोडून टाका आणि त्यांच्या मूर्ती अग्नीत जाळून टाका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकातून याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला अशासाठी निवडले आहे की, तुम्ही त्यांचा खूप मोलाचा ठेवा असावा. तुम्ही संख्येने अधिक होता म्हणून याहवेहने तुमची निवड केली नाही व तुमच्यावर प्रीती केली नाही, कारण तुम्ही तर सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अतिशय अल्प होता. पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले. म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात. परंतु जे त्यांचा द्वेष करतात, त्यांना ते नष्ट करण्यास संकोच करणार नाहीत; जे त्यांची घृणा करतात, त्यांची ते परतफेड करण्यास विलंब लावणार नाही. यास्तव, मी आज तुम्हाला देत आहे त्या सर्व आज्ञा, विधी व नियम पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या. तुम्ही या आज्ञा ऐकून त्या प्रामाणिकपणे पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे हा प्रीतीचा करार पुढेही पाळीत राहतील.

सामायिक करा
अनुवाद 7 वाचा

अनुवाद 7:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल; आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस. त्यांच्याशी सोयरीक करू नकोस; आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस; कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील. त्या लोकांशी तुम्ही अशा प्रकारे वागावे : त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती तोडून टाका आणि त्यांच्या कोरीव मूर्ती अग्नीत जाळून टाका. कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस म्हणून सार्‍या पृथ्वीवरील राष्ट्रांतून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हांला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता; पण परमेश्वराने तुम्हांला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून बाहेर आणले, ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे, आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. तेव्हा हे लक्षात घे की, तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो; जे त्याचा द्वेष करतात त्यांच्या डोळ्यांदेखत तो त्यांचे पारिपत्य करून त्यांचा नाश करतो. जो त्याचा द्वेष करतो त्याच्या बाबतीत विलंब न लावता त्याच्या डोळ्यांदेखत तो त्याचे पारिपत्य करतो. म्हणून जी आज्ञा आणि जे विधी व नियम मी आज तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक पाळ. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करील.

सामायिक करा
अनुवाद 7 वाचा