अनुवाद 28:6-13
अनुवाद 28:6-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील; ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापुढून सात वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल, आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती तिच्यात तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडील, व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल; तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील.
अनुवाद 28:6-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल. तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल. परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हास आपली पवित्र प्रजा करून घेईल. परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल. परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हास भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल. आपले आशीर्वादाचे भांडार परमेश्वर तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हास कर्ज काढावे लागणार नाही. आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
अनुवाद 28:6-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल. तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील. याहवेह तुमच्या धान्याची कोठारे आणि जे काही तुम्ही हाती घ्याल त्यास आशीर्वादित करतील, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जाल तिथे ते तुमची भरभराट करतील. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या व त्यांच्या मार्गात चालला तर ते तुम्हाला त्यांच्या शपथेनुसार, त्यांचे पवित्र लोक म्हणून प्रतिष्ठित करतील. मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील. याहवेह तुम्हाला अत्यंत संपन्न करतील—तुमची संतती, तुमच्या गुरांची पिल्ले आणि तुमच्या भूमीतील उपज—जसे त्यांनी तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते. प्रत्येक ॠतूत उत्तम पिके मिळावीत यासाठी याहवेह त्यांच्या आकाशातील अद्भुत असे पावसाचे भांडार तुम्हासाठी उघडतील व तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट ते आशीर्वादित करतील. अनेक राष्ट्रांना तुम्ही उसने द्याल, पण तुम्हाला उसने कधीही घ्यावे लागणार नाही. याहवेह तुम्हाला मस्तक करतील, शेपूट नव्हे. मी तुम्हाला आज देत असलेल्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळल्या, तर तुम्ही सतत उच्चस्थानी राहाल व कधीही खाली राहणार नाही.