अनुवाद 28
28
आज्ञापालनापासून मिळणारे आशीर्वाद
1याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे, त्या सर्व तुम्ही पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ असे राष्ट्र करतील. 2जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील व तुमच्यासह असतील:
3तुम्ही नगरात आणि शेतात आशीर्वादित व्हाल.
4तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.
5तुमच्या टोपल्या व तुमची पीठ मळण्याची परात आशीर्वादित होतील.
6तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल.
7तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील.
8याहवेह तुमच्या धान्याची कोठारे आणि जे काही तुम्ही हाती घ्याल त्यास आशीर्वादित करतील, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जाल तिथे ते तुमची भरभराट करतील.
9तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या व त्यांच्या मार्गात चालला तर ते तुम्हाला त्यांच्या शपथेनुसार, त्यांचे पवित्र लोक म्हणून प्रतिष्ठित करतील. 10मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील. 11याहवेह तुम्हाला अत्यंत संपन्न करतील—तुमची संतती, तुमच्या गुरांची पिल्ले आणि तुमच्या भूमीतील उपज—जसे त्यांनी तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते.
12प्रत्येक ॠतूत उत्तम पिके मिळावीत यासाठी याहवेह त्यांच्या आकाशातील अद्भुत असे पावसाचे भांडार तुम्हासाठी उघडतील व तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट ते आशीर्वादित करतील. अनेक राष्ट्रांना तुम्ही उसने द्याल, पण तुम्हाला उसने कधीही घ्यावे लागणार नाही. 13याहवेह तुम्हाला मस्तक करतील, शेपूट नव्हे. मी तुम्हाला आज देत असलेल्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळल्या, तर तुम्ही सतत उच्चस्थानी राहाल व कधीही खाली राहणार नाही. 14आज मी देत असलेल्या आज्ञांपासून तुम्ही परावृत्त होऊ नका, उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका, इतर दैवतांचे अनुसरण करू नका आणि त्यांची उपासनाही करू नका.
आज्ञाभंगामुळे शाप
15परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:
16तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.
17तुमच्या टोपल्या व तुमचे पीठ मळण्याचे परात शापित होईल.
18तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील.
19तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल.
20जर तुम्ही याहवेहचा त्याग करून दुष्कर्मे करीत राहिलात तर तुम्ही ज्या कार्यात हात घालाल त्या प्रत्येक गोष्टीत याहवेह शाप, गोंधळ आणि संकटे आणतील व सरतेशेवटी तुमचा अचानक आणि संपूर्णपणे नाश करतील. 21जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील. 22याहवेह तुम्हावर क्षयरोग, ज्वर, दाह, साथीचे रोग व अवर्षण, तांबेरा व बुरशी पाठवतील, तुमचा संपूर्ण नाश होईपर्यंत या पीडा तुमचा पिच्छा पुरवतील. 23तुमच्या डोक्यावरील आकाश कास्यासारखे होऊन तुमच्या पावला खालील भूमी लोखंडासारखी होईल. 24पावसाच्या ऐवजी याहवेह तुमच्यावर, तुमचा नाश होईपर्यंत, धुळीच्या व वाळूच्या वादळांचा आकाशातून वर्षाव करतील.
25तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव व्हावा, असे याहवेह करतील. तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने चाल करून जाल, पण सात दिशांनी गोंधळून पळ काढाल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांकरिता तुम्ही भयानक विनाशाचे उदाहरण व्हाल. 26तुमची प्रेते पक्ष्यांचे आणि वन्यपशूंचे भक्ष्य होतील आणि त्यांना दूर हाकलून देण्यास तिथे कोणीही नसेल. 27याहवेह तुम्हावर इजिप्त देशातील गळवे, मूळव्याध, खवडे व खरूजाच्या अशा पीडा आणतील की ज्यातून तुम्ही कधीच बरे होणार नाही. 28याहवेह तुम्हाला वेडे व आंधळे करतील आणि तुमची मने गोंधळून जातील. 29ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य चाचपडतो तसे, तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात चाचपडाल. जे काही तुम्ही हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळणार नाही; तुमच्यावर सतत जुलूम होत राहील आणि तुम्ही सतत लुबाडले जाल, यातून कोणीही तुम्हाला सोडविणारा राहणार नाही.
30तुमच्या वाग्दत्त वधूला दुसराच कोणी नेईल व तिचे शीलभंग करेल. तुम्ही घर बांधाल, पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुम्ही द्राक्षमळा लावाल, पण त्या फळांचा उपभोग तुम्ही करू शकणार नाही. 31तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही. 32तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल. 33तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल. 34तुमच्यासमोर जे येईल ते पाहून तुम्हाला वेड लागेल. 35याहवेह तुमच्या गुडघ्या व पायावर कधीही बरी होणार नाही अशी वेदना देणारी फोडी येऊ देतील, जे अगदी तुमच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत भरून जातील.
36तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कधीही माहीत नसलेल्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला आणि तुम्ही स्वतःवर नेमलेल्या राजाला हद्दपार करतील. तिथे तुम्ही इतर दैवतांची उपासना कराल, जे लाकडाचे आणि दगडाचे दैवत असेल. 37याहवेह तुम्हाला अशा सर्व राष्ट्रांमध्ये ओढून नेतील, जिथे तुम्ही भयाचा, म्हणीचा आणि उपहासाचा विषय बनाल.
38तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील. 39तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल. 40तुमच्या सर्व देशात जैतुनाची झाडे वाढतील, पण तुम्ही तेलाचा उपयोग करू शकणार नाही. तुम्हाला तेल लावण्यासाठी पुरेसे जैतून तेल मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून जातील. 41तुम्हाला पुत्र व कन्या होतील, पण त्यांना तुम्ही ठेऊ शकणार नाही, कारण ते गुलामगिरीत जातील. 42टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.
43तुम्हामध्ये राहणारे परदेशी लोक तुमच्यावर अधिकाधिक वरचढ होत जातील, पण तुमची अधिकाधिक अधोगती होत जाईल. 44ते तुम्हाला उसने देतील, पण तुम्ही त्यांना उसने देऊ शकणार नाही. ते मस्तक होतील आणि तुम्ही शेपूट व्हाल.
45हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले. 46ही अरिष्टे सदैव तुमच्यावर व तुमच्या संततीवर चिन्ह आणि चमत्कार असे होतील. 47कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची समृद्धीच्या काळात आनंदाने आणि हर्षाने सेवा केली नाही, 48म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.
49याहवेह तुमच्यावर दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून एक राष्ट्र पाठवतील, ते गरुडाप्रमाणे झेप घेऊन तुमच्यावर तुटून पडतील, ते असे राष्ट्र असेल ज्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही, 50ते क्रूर चेहर्याचे राष्ट्र असेल, जे तुमच्यातील वृद्धांना आदर देणार नाहीत किंवा तरुणांना दयामाया दाखविणार नाहीत. 51तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील. 52ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालेल आणि तुमचे सर्व उंच व मजबूत तट, ज्यावर तुमची भिस्त आहे, ते पाडून टाकतील. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या देशातील सर्व शहरांना ते वेढा घालतील.
53तुमच्या शत्रूंनी वेढा दिल्यामुळे आणि त्यांच्या छळामुळे, तुम्ही तुमच्या पोटचे फळ म्हणजे तुमचे पुत्र व कन्या देखील तुम्ही खाऊन टाकाल, जे याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. 54तुमच्यातील अत्यंत कोमलहृदयी व सुसंस्कृत पुरुषाला देखील आपला भाऊ, आपली प्राणप्रिय पत्नी आणि जगून वाचून राहिलेल्या मुलांवरही दयामाया येणार नाही, 55आणि तो त्याच्या मुलांचे जे मांस खाईल त्याचे मांस तो त्यापैकी कोणालाही देणार नाही. कारण तुमच्या शहरांना वेढा पडल्यामुळे त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहणार नाही. 56ऐश्वर्यसंपन्न असल्यामुळे जिने आपला तळवाही कधी जमिनीला लावला नाही अशी घरंदाज व कोमलहृदयी पत्नी इतकी कठोरहृदयी बनेल की आपला प्राणप्रिय पती, पुत्र किंवा कन्या यांना ती आपल्या अन्नाचे वाटेकरी होऊ देणार नाही, 57आपल्याच पोटचा गर्भ व आपल्याच पोटची मुले स्वतःलाच गुप्तपणे खाता यावी म्हणून ती लपवून ठेवील. अशाप्रकारे या वेढ्याच्या काळातील भूक खूप भयानक असेल आणि तुमच्या शत्रूकडून तुम्हाला तुमच्याच वेशींच्या आत भयंकर संकट व यातना भोगाव्या लागतील.
58या पुस्तकात नमूद केलेली नियमशास्त्राची वचने तुम्ही प्रामाणिकपणे आचरणात आणली नाही आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या अद्भुत आणि भयावह नावाचा मान तुम्ही राखला नाही, 59तर याहवेह तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर असाध्य रोग आणि कधीही न थांबणारे भयंकर साथीचे रोग पाठवतील. 60ज्या रोगांना तुम्ही भिता, असे इजिप्तमधील सर्व रोग तुमच्यावर आणतील आणि ती तुम्हाला लागून राहतील. 61तुमचा नाश होईपर्यंत याहवेह तुम्हावर प्रत्येक आजार आणि सर्व साथींचे रोग आणि या नियमशास्त्र ग्रंथात ज्यांचा उल्लेख नाही, असे सर्व रोग तुम्हावर आणतील. 62तुम्ही आकाशातील तार्यांप्रमाणे अगणित असला, तरी अगदीच थोडके उराल, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आज्ञापालन केले नाही. 63तुमची भरभराट करण्यात व तुम्हाला बहुगुणित करण्यात जसा याहवेहला आनंद वाटला, तसाच आनंद त्यांना तुमचा नाश व नायनाट करण्यातही वाटेल. जो देश तुम्ही ताब्यात घेण्यास जात आहात, त्या देशातून तुमचे उच्चाटन करण्यात येईल.
64पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत असलेल्या निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुमची पांगापांग करतील. तिथे तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी ज्यांची कधीही उपासना केली नाही—अशा लाकडाच्या आणि दगडाच्या दैवतांची तुम्ही उपासना कराल. 65त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला स्वास्थ्य मिळणार नाही, तुमच्या पायांना विसावा मिळणार नाही, तिथे तुमची हृदये थरथर कापत राहतील, तुमचे डोळे म्लान होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल, असे याहवेह करतील. 66तुम्ही सदैव संशयात जगाल, रात्रंदिवस तुम्ही भीतीने ग्रस्त राहाल, तुमच्या जीवनाची काहीच खात्री राहणार नाही. 67तुमची अंतःकरणे भयग्रस्त झाल्यामुळे सारखी धडधडत राहतील, त्यामुळे सकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता रात्र असती, तर किती बरे झाले असते!” आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, “अहा, आता सकाळ असती तर किती बरे झाले असते!” 68जो प्रवास तुम्ही कधीही करणार नाही असे याहवेह म्हणाले होते, तोच प्रवास याहवेह तुम्हाला करावयाला लावतील आणि जहाजातून मी तुम्हाला पुन्हा इजिप्त देशामध्ये पाठवेन. मग तिथे तुमच्या शत्रूंनी तुम्हाला पुरुष व स्त्री गुलाम म्हणून विकत घ्यावे यासाठी तुम्ही स्वतःला देऊ कराल, परंतु तुम्हाला कोणाही विकत घेणार नाही.
सध्या निवडलेले:
अनुवाद 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.