YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6:19-28

दानीएल 6:19-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग मोठ्या पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला. गुहेजवळ येताच तो दु:खीस्वराने दानीएलास हाक मारू लागला तो म्हणाला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्यास सिंहापासून तुला सोडवता आले काय? दानीएल राजास म्हणाला, “महाराज चिरायू असा माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला. तेव्हा राजाच्या आज्ञेवरून, ज्यांनी दानीएलावर आरोप केले त्या लोकांस पकडण्यात आले तेव्हा सर्वांना त्यांची मुले पत्नीसह सिंहाच्या गुहेत टाकले ते गुहेत तळ गाठण्याच्या आधीच सिंहानी त्याच्या हाडांचा चुराडा केला. मग दारयावेश राजाने सर्व भूतलावरील सर्व् लोकांस सर्व राष्ट्रांस व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस असे लिहीले: “तुमची शांती तुमच्यासाठी वाढत जावो.” मी असे जाहीर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे; कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे. तो आम्हास सुरक्षीत करतो, आणि आम्हास सोडवतो. तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह; आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले. मग हा दानीएल दारयावेशाच्या राज्यात आणि कोरेश पारसीच्या कार्यकाळात समृध्द झाला.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा

दानीएल 6:19-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?” तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो! माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.” तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता. नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्‍यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले. नंतर दारयावेश राजाने पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आणि सर्व भाषा बोलणार्‍यांना लोकांना लिहिले: “तुमची भरपूर उन्नती होवो! “माझ्या राज्याच्या प्रत्येक भागातील लोकांनी दानीएलच्या परमेश्वराचे भय बाळगावे आणि आदर करावा. “कारण ते जिवंत परमेश्वर आहे आणि ते सर्वकाळ टिकणारे आहेत; त्यांच्या राज्याचा कधीच नाश होणार नाही व त्यांचे प्रभुत्व कधीही संपणारे नाही. ते सुटका करतात व ते वाचवितात; ते आकाशात आणि पृथ्वीवर चिन्ह आणि चमत्कार करतात. त्यांनीच दानीएलला सिंहांच्या तावडीतून सोडविले आहे.” याप्रमाणे दारयावेश राजाच्या आणि कोरेश पारसीच्या कारकिर्दीत दानीएल समृद्ध झाला.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा

दानीएल 6:19-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?” दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!” मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.” हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा