YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:1-31

दानीएल 5:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

काही वर्षानंतर, एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्या समोर तो द्राक्षरस प्याला. बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरूशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले. त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल. तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की, जे भूतविद्या करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल. राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.” तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले. राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका. आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात, प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले आपला बाप राजा नबुखद्नेस्सराने त्यास सर्व जादूगार भूतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्यास नेमले. उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.” नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते. मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे. मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना. मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू ह्याचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.” नंतर दानीएलाने राजास उत्तर दिले, “तुझ्या भेटी तुलाच राहू दे आणि तुझी बक्षीसे दुसऱ्यांना दे तरीही मी लिखान वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो. हे राजा सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सराला राज्य, महानता, प्रतिष्ठा आणि वैभव दिले. त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भित होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे. पण जेव्हा त्याचे हृदय ताठ झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला तो मुद्दामपणे वागला तेव्हा त्यास राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरावण्यात आले. त्यास मानवातून हाकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशूसारखे झाले आणि तो रानगाढवात राहीला. तो बैलासारखे गवत खाई, व त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहीजे ते त्याने स्थापीत करतो हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस. म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले. हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’ ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.” तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याला ठार मारण्यात आले. आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:1-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला. बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील. म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली. द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले. एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली. तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले. मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्‍यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.” नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना. यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले. राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते. त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.” तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता? तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे. ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही. मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.” दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्‍या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन. “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते. कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत. परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले. त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात. “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही. म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे. “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन. “या शब्दांचा अर्थ हा असा: “ मने : परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. “ तकेल : तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. “ फारसीन : आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.” नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, ‘माझा बाप नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यांतून द्राक्षारस पिता येईल.’ तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले; राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.” मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते; कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.” तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.” तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की, “तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसर्‍या कोणास दे, तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून तुला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस; म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा : मने, मने, तकेल, ऊफारसीन. ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.” तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला. आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा