दानीएल 4:28-33
दानीएल 4:28-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. “काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली.” जेव्हा राजा हे बोलत होता. पाहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.” हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली.
दानीएल 4:28-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?” तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे. तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.” नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली.
दानीएल 4:28-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे सगळे नबुखद्नेस्सर राजा ह्याच्यावर गुजरले. बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!” हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.” त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.