दानीएल 4:19-27
दानीएल 4:19-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो. जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते. ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते. हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात. हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, पण त्यांचा बुंधा जमिनीत राहू दया, ह्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्षे वनपशुसोबत राहो.’ हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे. तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल, तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील, सात वर्षे जाईपर्यंत तू हे जानशील की, मानवावर देवाची सत्ता आहे. जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे, जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल. म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”
दानीएल 4:19-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते! तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते, ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली; महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे. “हे महाराज, नंतर आपणाला येणारा एक पवित्र दूत दिसला आणि तो म्हणत होता, ‘वृक्ष तोडा, त्याचा नाश करा, पण त्याचा बुंधा व मुळे तशीच जमिनीतील गवतात राखा. त्याच्याभोवती हिरवळ असेल व तो लोखंडाच्या आणि कास्याच्या पट्टयाने बांधलेला असेल. आकाशातील दवाने तो भिजून जावो! सात वर्षे मैदानातल्या पशूंसारखी त्याची गत होवो!’ “महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे: तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात. परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल. म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”
दानीएल 4:19-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्यांना लागू पडो! आपण वृक्ष पाहिलास तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला; त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खाण्यास पुरेशी होती, त्याच्याखाली वनपशू राहत होते व त्याच्या शाखांत अंतराळातील पक्षी वस्ती करत होते; महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे. आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो. महाराज, ह्याचा अर्थ असा आहे आणि माझे स्वामीराजे, ह्याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे : आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवायला सांगितले; ह्याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान आपणाला झाले म्हणजे आपले राज्य निश्चयाने आपणास मिळेल.’ म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”