दानीएल 4:1-9
दानीएल 4:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नबुखद्नेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकात फर्मान पाठवले की, तुमचे कल्याण होवो. सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे; त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत, त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते. मी, नबुखद्नेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो. मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले. म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील. तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना. शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले. बेल्टशस्सरा, सर्व ज्ञान्यांच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गुढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग.
दानीएल 4:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो. परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे. किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत. मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो. माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली. जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही. अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.) मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग.
दानीएल 4:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्या लोकांना : तुमचे कल्याण असो! परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो; मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरतेशेवटी दानीएल माझ्यापुढे आला; त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्टशस्सर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठायी पवित्र देवांचा आत्मा वसत आहे, त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेल्टशस्सरा, ज्योतिष्यांच्या अध्यक्षा, पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे, तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टान्त व त्यांचा अर्थ मला सांग.