दानीएल 2:25-30
दानीएल 2:25-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.” राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?” दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही. तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा. आपण जसे बिछान्यात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास पुढे होणारी घटना कळविली. आता माझी गोष्ट, ती अशी की; हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर मनुष्यांपेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा व जो आपल्या मनातील गहन विचार समजावे.
दानीएल 2:25-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, “महाराजांस स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहूद्यांमध्ये मला आढळला आहे.” बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?” दानिएलाने राजाला उत्तर दिले की, “महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ ह्यांना महाराजांना सांगता येणार नाही; तरी रहस्ये प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार हे नबुखद्नेस्सर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न, आपण बिछान्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टान्त असा आहे : महाराज, आपली गोष्ट अशी की, ह्यापुढे काय घडणार हे विचार आपण बिछान्यावर पडला असता आपल्या मनात आले आणि ह्यापुढे काय होणार हे, रहस्ये प्रकट करणार्या देवाने आपणांला कळवले आहे. आता माझी गोष्ट अशी आहे की, हे रहस्य मला प्रकट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नांचा अर्थ प्रकट व्हावा व आपणांला आपल्या मनातील विचार समजावेत म्हणून झाले आहे.