YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 2:1-16

दानीएल 2:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.” ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हांला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल; ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा.” ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे; परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही, तर तुमच्यासंबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हांला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल.” खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे; मानवात वास न करणार्‍या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही.” हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली. ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला, तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले. राजाच्या गारद्यांचा नायक अर्योक हा बाबेलच्या ज्ञान्यांचा वध करण्यास निघाला होता, त्यांच्याबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेचे भाषण केले. त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली. मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.”

सामायिक करा
दानीएल 2 वाचा

दानीएल 2:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराज चिरायू असा! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू!” राजाने खास्दी लोकांस उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील. पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हास माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.” ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे. पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.” खास्दी लोकांनी राजास उत्तर केले, “या जगात असा कोणताच मनुष्य नाही जो राजाची ही मागणी पूर्ण करेल असा कोणताच महान आणि प्रतापी राजा नाही ज्याने असे मागणे ज्योतिषी, भुतविद्या जाणणारे आणि ज्ञानी लोकांस केली असेल. महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.” हे ऐकून राजा रागाने संतापला आणि त्याने आज्ञा केली की, बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा. हे फर्मान निघाले म्हणून जे त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जात होते त्यास मरणास सामोरे जावे लागणार होते, आणि लोक दानीएल आणि त्यांच्या मित्रांना शोधू लागले यासाठी की, त्यांचा घात करावा. तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांचा घात करायला निघाला होता, त्यास दुरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला. दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले. मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”

सामायिक करा
दानीएल 2 वाचा