प्रेषितांची कृत्ये 9:32-42
प्रेषितांची कृत्ये 9:32-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला. लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे. जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.” पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती. यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:32-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पेत्र त्या देशात प्रवास करीत असताना, प्रभूच्या लोकांना भेटण्यासाठी तो लोद गावात आला. तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. लोद व शारोन या शहरात राहणार्या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले. आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे. याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. लोद योप्पाच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली. पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली. पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत सादर केले. ही घटना योप्पामध्ये समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:32-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.” तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:32-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेत्र सर्वत्र फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही तो गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. आणखी यापोमध्ये टबीथा (ग्रीक भाषेत दुर्कस म्हणजेच हरिणी) नावाची कोणी एक स्त्री होती. ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले. लोद हे गाव यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे, असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे यायला उशीर करू नकोस.” पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले, त्याच्यासभोवती सर्व विधवा जमा झाल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता, ती जे अंगरखे व जी वस्त्रे तयार करत असे ती त्यांनी रडत रडत त्याला दाखवली. पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली मग शवाकडे वळून म्हटले, “टबीथा, ऊठ.” तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले. यापोमधील सर्वांना हा चमत्कार कळला आणि पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.