प्रेषित 9
9
शौलाचे परिवर्तन
1इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वास घेताना प्रभुच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो प्रमुख याजकाकडे गेला 2आणि दमास्कस येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया, जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेम येथे न्यावे. 3तो प्रवास करीत दमास्कस जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला. 4तो जमिनीवर पडला आणि त्याच्याशी बोलत आहे अशी एक वाणी त्याने ऐकली, ती म्हणाली, “शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस?”
5“प्रभुजी, आपण कोण आहात?” शौलाने विचारले.
“ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, 6तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”
7शौलाच्या बरोबर प्रवास करणारे निःशब्द होऊन उभे राहिले; त्यांनी आवाज ऐकला खरा, परंतु त्यांनी कोणाला पाहिले नाही 8मग शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले पण त्याला काहीच दिसत नव्हते. मग त्यांनी त्याला हाताला धरून दमास्कस या ठिकाणी नेले. 9तेथे तो तीन दिवस आंधळा होता आणि त्याने अन्न व पाणी सेवन केले नाही.
10आता दमास्कस येथे हनन्या नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टांतामध्ये प्रभुने त्याला हाक मारली, “हनन्या!”
हनन्या उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभुजी.”
11प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाच्या घरी जा. तेथे तार्सस येथील शौल, नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे. 12त्याने दृष्टांतात पहिले आहे की, हनन्या नावाचा कोणी एक माणूस येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.”
13हनन्या म्हणाला, “प्रभुजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे. 14आणि तुझे नाव घेणार्या सर्वांस अटक करावी असा अधिकार त्याला प्रमुख याजकाकडून मिळाला आहे.”
15परंतु प्रभू हनन्याला म्हणाला, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएल लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे. 16माझ्या नावासाठी किती त्रास सहन करावा लागेल, हे मी त्याला दाखवीन.”
17नंतर हनन्या त्याच्या घराकडे गेला आणि तो घरात गेला. त्याने त्याचे हात शौलावर ठेवीत म्हटले, “शौल बंधू, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूंनी तुला दर्शन दिले, त्याने मला यासाठी पाठविले आहे की, तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस.” 18त्याचक्षणी, त्याच्या डोळ्यांवरुन खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला, 19त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याची शक्ती त्याला पुन्हा प्राप्त झाली.
शौल दमास्कस व यरुशलेममध्ये
शौलाने दमास्कसमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले. 20ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला. 21ज्यांनी त्याची शुभवार्ता ऐकली, ते सर्वजण आश्चर्याने थक्क झाले आणि विचारू लागले, “यरुशलेममध्ये येशूंच्या नावाने धावा करणार्यांची धूळधाण करणारा माणूस तो हाच नव्हे काय आणि तो येथे त्यांना कैद करून प्रमुख याजकांकडे नेण्यासाठी आलेला होता, हे खरे आहे ना?” 22तरी शौल अधिक सामर्थ्यवान होत गेला आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून दमास्कसमध्ये राहणार्या यहूदीयांस त्याने निरुत्तर केले.
23यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, 24परंतु शौलाला त्यांची योजना समजली. त्याला मारून टाकण्यासाठी रात्रंदिवस ते शहराच्या द्वारावर नजर ठेऊन होते. 25परंतु त्याच्या अनुयायांनी त्याला रात्रीच नेऊन टोपलीत बसवले आणि शहराच्या भिंतीतील झरोक्यातून खाली उतरविले.
26तो यरुशलेममध्ये आल्यावर, येशूंच्या शिष्यांबरोबर सामील होण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्या सर्वांना त्याचे भय वाटत होते, कारण तो खरोखर शिष्य आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. 27परंतु बर्णबाने त्याला प्रेषितांपुढे आणले आणि कशाप्रकारे दमास्कस रस्त्यावर शौलाला प्रभुचे दर्शन झाले आणि प्रभुने त्याला काय सांगितले आणि दमास्कस येथे त्याने निर्भयपणाने येशूंच्या नावामध्ये शुभवार्ता कशी सांगितली, हे सर्व त्यांना कथन केले. 28शौल त्यांच्याबरोबर तेथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभुच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला. 29तो ग्रीक यहूदीयांशी#9:29 या यहूदी लोकांनी त्यांची भाषा व संस्कृती अवगत केली होती. बोलत असे व वादविवाद करीत असे, परंतु त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. 30जेव्हा इतर विश्वासणार्यांनी यासंबंधी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला कैसरीयास नेले आणि नंतर तेथून तार्सस येथे त्याची रवानगी केली.
31नंतर यहूदीया, गालील आणि शोमरोन या प्रांतातील सर्व मंडळ्यांना शांतता लाभली आणि ते विश्वासात दृढ असे झाले. प्रभुचे भय धरून राहिल्यामुळे आणि पवित्र आत्म्याच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या संख्येत वाढ झाली.
एनियास आणि दुर्कस
32पेत्र त्या देशात प्रवास करीत असताना, प्रभुच्या लोकांना भेटण्यासाठी तो लोद गावात आला. 33तेथे त्याला एनियास नावाचा एक माणूस भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. 34पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरुण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. 35लोद व शारोन या शहरात राहणार्या सार्या लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभुकडे वळले.
36आता यापोमध्ये टबीथा या नावाची शिष्या रहात होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे. 37याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता. 38लोद यापोच्या जवळ होते; जेव्हा शिष्यांनी ऐकले की पेत्र लोद गावी आला आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडे दोन माणसे पाठवून, “ताबडतोब या” अशी त्याला विनवणी केली.
39पेत्र त्यांच्याबरोबर गेला, तो आल्यावर त्याला माडीवरील खोलीत नेण्यात आले. सर्व विधवा तिच्याभोवती उभ्या राहून शोक करीत होत्या आणि दुर्कस जिवंत असताना तिने त्यांच्यासाठी तयार केलेले अंगरखे आणि इतर वस्त्रे त्यांनी पेत्राला दाखविली.
40पेत्राने सर्वांना खोली बाहेर जाण्यास सांगितले; मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृत स्त्रीकडे वळून तो म्हणाला, “टबीथा, ऊठ.” तिने आपले डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. 41त्याने आपला हात पुढे करून तिला पायांवर उभे राहण्यास मदत केली. नंतर त्याने विश्वासणार्यांना, विशेषकरून विधवांना आत बोलाविले आणि त्यांच्यापुढे तिला जिवंत असे सादर केले. 42ही घटना यापोमध्ये समजली आणि अनेकांनी प्रभुवर विश्वास ठेवला. 43पेत्र यापो येथे शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी बरेच दिवस राहिला.
सध्या निवडलेले:
प्रेषित 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.