YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:35-40

प्रेषितांची कृत्ये 7:35-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले. तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून. ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’

प्रेषितांची कृत्ये 7:35-40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिपती व न्यायाधीश कोणी नेमले?’ असे विचारुन पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले. आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले. “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा उठवेल;’ तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरीता जिवंत वचने त्याला मिळाली. “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. या व्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यासाठी तू देवांना तयार कर, म्हणजे ते आमच्यापुढे जातील. कारण ज्याने आम्हाला इजिप्तमधून काढून आणले त्या मोशेचे काय झाले ते आम्हाला माहीत नाही!’

प्रेषितांची कृत्ये 7:35-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

‘तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले,’ असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. ‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका]. रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे; कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.’

प्रेषितांची कृत्ये 7:35-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

‘तुला सत्ताधिकारी व न्यायाधीश कोणी केले’, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या साहाय्याने, देवाने सत्ताधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला. परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’