YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 28:26-30

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे; ते कानांनी मंद ऐकतात; आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.” [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘या लोकांकडे जा आणि त्यांना सांग, “ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना काही समजणार नाही; तुम्ही पाहत राहाल पण तुम्हाला त्याचे ज्ञान होणार नाही.” कारण या लोकांचे हृदय कठीण झाले आहे; त्यांना कानाने क्वचितच ऐकू येते, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत. अन्यथा ते आपल्या डोळ्यांनी पाहतील, कानाने ऐकतील, हृदयाने समजून घेतील व माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.’ “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी जोरदारपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तेथेच त्याला भेटण्यास येणार्‍यांचे तो स्वागत करीत असे.

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’. म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.” तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.