YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 28:1-16

प्रेषितांची कृत्ये 28:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.” परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.

प्रेषितांची कृत्ये 28:1-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

किनार्‍यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते. त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती. तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला. त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, “हा माणूस खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.” परंतु पौलाने तो साप झटकून आगीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले. त्यांच्या जवळच त्या बेटाचा पुबल्य नावाचा जो मुख्याधिकारी होता, त्याची जमीन होती. त्याने त्याच्या घरी आमचे स्वागत केले आणि तीन दिवस आदरातिथ्य केले. त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले. हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला. तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. या जहाजाच्या समोरील भागावर क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती. सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो. तेथून आम्ही निघालो आणि रेगियोनास आलो. दुसर्‍या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तेथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो. तेथे आम्हाला काही विश्वासी आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो. तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले. पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.

प्रेषितांची कृत्ये 28:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हांला समजले. तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.” त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते; पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, ‘हा कोणी देव आहे.’ इकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकार्‍याच्या जमिनी आसपास होत्या; त्याने आमचे आगतस्वागत करून तीन दिवस आदराने आमचा पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की, पुब्ल्याचा बाप तापाने व आवरक्ताने आजारी पडला होता; त्याच्याकडे आत जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्‍या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले. ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरै2 ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो. मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो; आणि एक दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही पुत्युलास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो. तेथील बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हांला सामोरे आले; त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले. आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.

प्रेषितांची कृत्ये 28:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले. तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. पौलने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.” त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही. त्याला सूज येईल अथवा तो एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते, पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही, असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, “हा कोणी देव आहे.” तिकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे स्वागत करून आदराने आमचा पाहुणचार तीन दिवस केला. तेव्हा असे झाले की, पुब्ल्यचा बाप तापाने व आंवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या. ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियातील दयस्कुरै (जुळी दैवते) ह्या नावाचे जे तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ थांबले होते, त्यात बसून आम्ही निघालो. सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोना ह्या ठिकाणी आलो. दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युल नगरास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो. तेथले बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची बाजारपेठ व तीन उतारशाळा नावाच्या ठिकाणापर्यंत आम्हांला सामोरे आले, त्यांना पाहून पौलने देवाचे आभार मानले, त्याला बराच धीर आला. आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.