YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 28:1-16

प्रेषि. 28:1-16 IRVMAR

जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.” परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.

प्रेषि. 28:1-16 साठी चलचित्र