YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 25:13-27

प्रेषितांची कृत्ये 25:13-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली, तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे. मी यरूशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडीलांनी फिर्याद करून त्याच्याविरुध्द ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरीता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.” म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला. त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुध्द बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत. उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणाएका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला, येशू हा जरी मरण पावलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे. या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना, तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्यास यरूशलेम शहरास नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले. सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे. यावर अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते,” फेस्ताने त्यास उत्तर दिले, “उद्या,” त्याचे म्हणणे, “तुम्ही ऐकू शकाल.” म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला, तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले. मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्यास पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे, याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात. परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्यास कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे. परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माझ्याकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे, ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे. शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.”

प्रेषितांची कृत्ये 25:13-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले. ते तेथे अनेक दिवस वास्तव्य करीत असल्यामुळे, फेस्ताला राजाबरोबर पौलाच्या प्रकरणाची चर्चा करण्यास वेळ मिळाला. तो म्हणाला: “फेलिक्साने ज्याला कैदेत तसेच ठेवले होते असा एक मनुष्य येथे आहे. मी यरुशलेम येथे गेलो होतो, तेव्हा तेथील प्रमुख याजकांनी व इतर यहूदी पुढार्‍यांनी त्याच्यावर दोषारोप करून त्याला शिक्षा द्यावी अशी मला विनंती केली. “मी त्यांना सांगितले की, रोमी प्रथेनुसार आरोपी व वादी समोरासमोर येणे व आरोपीला स्वतःला आरोपाचे खंडण करण्याची संधी मिळाल्याशिवाय कोणालाही दंड देणे योग्य नाही. ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्‍याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला, व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला. परंतु त्याच्याविरुद्ध केलेले आरोप माझ्या कल्पनेप्रमाणे मुळीच नव्हते. ते आरोप त्यांच्या धर्मासंबंधी आणि मरण पावलेल्या कोणा येशूंसंबंधी होते तरी, पौल खात्रीने सांगतो की तो जिवंत आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात कसा काय निर्णय द्यावा याविषयी मी गोंधळात पडलो. तेव्हा मी पौलाला या आरोपांची चौकशी यरुशलेममध्ये व्हावी यास त्याची मान्यता आहे का, असे विचारले. परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.” त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.” फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.” तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रूबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसमवेत आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले. मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहता कामा नये. माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरवले आहे. परंतु मी बादशहाला काय निश्चित लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे तपासणीसाठी आणले आहे यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल. कारण एका कैद्यावर कोणताही आरोप त्याच्याविरुद्ध स्पष्ट झाल्याशिवाय त्याला रोमकडे पाठविणे योग्य होणार नाही.”

प्रेषितांची कृत्ये 25:13-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्यांबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, ‘यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?’ तेव्हा ‘बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे’ अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ‘ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”’ अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे,” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल.” दुसर्‍या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. तेव्हा फेस्त म्हणाला, “अग्रिप्पा राजे व आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना? ‘ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये’ असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्‍चित असे लिहिण्यासारखे काही नाही, तुमच्यापुढे व विशेषेकरून अग्रिप्पा राजे, आपणापुढे ह्याला आणले आहे; अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहिण्यास सापडेल. कारण बंदिवानास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही.”

प्रेषितांची कृत्ये 25:13-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली. तेथे ती दोघे पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्तने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमला गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुदी लोकांच्या मुख्य याजकांनी व वडीलजनांनी फिर्याद करून त्याला शिक्षा करावी अशी विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची संधी आरोपीला मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही. म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या दुष्ट गुन्ह्यांचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी त्यांचा व पौलाचा वाद होता. ह्याची चौकशी कशी चालवावी, हे मला समजेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, ‘यरुशलेम येथे जाऊन ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?’ परंतु बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसरकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.” अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.” दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरवले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही म्हणून तुमच्यापुढे व विशेषकरून हे राजा अग्रिप्पा, आपणापुढे ह्याला आणले आहे. अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे; कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”