YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 25:13-27

प्रेषितांचे कार्य 25:13-27 MACLBSI

काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली. तेथे ती दोघे पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्तने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमला गेलो होतो, तेव्हा त्याच्यावर यहुदी लोकांच्या मुख्य याजकांनी व वडीलजनांनी फिर्याद करून त्याला शिक्षा करावी अशी विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची संधी आरोपीला मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमन लोकांची रीत नाही. म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या दुष्ट गुन्ह्यांचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी त्यांचा व पौलाचा वाद होता. ह्याची चौकशी कशी चालवावी, हे मला समजेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, ‘यरुशलेम येथे जाऊन ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा, अशी तुझी इच्छा आहे काय?’ परंतु बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसरकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.” अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे.” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकावयास मिळेल.” दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्तने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. फेस्त म्हणाला, “हे राजा अग्रिप्पा व उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना! ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहुदी लोकांच्या सर्व समुदायाने यरुशलेम व येथेही मला अर्ज केला. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, असे मला कळून आले आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरवले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही म्हणून तुमच्यापुढे व विशेषकरून हे राजा अग्रिप्पा, आपणापुढे ह्याला आणले आहे. अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे; कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”

प्रेषितांचे कार्य 25:13-27 साठी चलचित्र