YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:38-47

प्रेषितांची कृत्ये 2:38-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.” आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते, ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत; सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.

प्रेषितांची कृत्ये 2:38-47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.” आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली. प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. तेव्हा सर्व विश्वासणारे एकत्र होते आणि त्यांच्याजवळ असलेले सर्वकाही समाईक होते. जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.

प्रेषितांची कृत्ये 2:38-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.” आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.

प्रेषितांची कृत्ये 2:38-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.” आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!” त्या वेळी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला व त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत. प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते. विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.

प्रेषितांची कृत्ये 2:38-47

प्रेषितांची कृत्ये 2:38-47 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा